Tuesday, February 17, 2015

दिन विशेष - १८ फेब्रुवारी

गोपाळ हरी देशमुख

मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक

जन्मदिन - फेब्रुवारी १८, इ.स. १८२३

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे

गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.

No comments:

Post a Comment