भीमराव रामजी आंबेडकर
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार
जन्मदिन : एप्रिल १४, इ.स. १८९१
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. [२].[३]./[४] भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
पुरस्कार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.त्यांपैकी काही असे:-
दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’
फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने दिला गेलेला समाजरत्न पुरस्कार
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार
भारतीय राज्यघटनेची उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
No comments:
Post a Comment